काही लोकांनी काकांचा पक्ष चोरला अशी झोंबरी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांची 3 इंद्रिये निकामी झालेत त्यामुळे संजय राऊत अशी बेताल वक्तव्य करीत असतात असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्या शरीरात जी इंद्रिय आहेत त्यातील दोन इंद्रिय निकामी झालेली दिसतायत एक म्हणजे जीभ आणि दुसरे म्हणजे डोळे आणि तिसरा अवयव मला सांगायचा आहे तो म्हणजे मेंदू..ज्यावेळी ही तीन इंद्रिय काम करीत नाहीत तेव्हा हे बेताल वक्तव्य येतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस कुणाचा आहे. कुणाच्या मालकीचा आहे हे एकदा बघावं नाही तर तुमच्या डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन आम्हाला करावं लागेल असे अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष’ असा उल्लेख केला आहे. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी म्हणाले.
मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रालयात सातत्याने काम करणारे केवळ अजित पवारच होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले होते. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता अजित पवार मंत्रालयात काम करत होते. देशात तरुणांना आकर्षित करत असेल आणि आपले राज्य विकासाच्या मार्गाने नेईल, असे कोणते नेतृत्व असेल तर ते पीएम मोदींचे नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले होते. आमचा नेता जे सांगेन तेच धोरण आणि आमचा नेता जो बांधेन तेच तोरण हीच आमची भूमिका आहे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.
महायुताने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा मेळावा आयोजित केला आहे. आम्ही एकत्र आहोत. हे सांगण्यासाठी हा महामेळावा आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला. एकमेकांच्या विरोधात असणारे एकत्रित कसे आले? आमच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई याबाबत भूमिका मांडली, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.
