मीरारोड हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक

मीरारोड हिंसाचार प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, तसेच 50 ते 60 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन, नया नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना 48 तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. मिरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक दिली आहे.

लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भाजप नेते नितेश राणे आज संध्याकाळी 6 वाजता मीरा रोडला भेट देणार असून पोलीस आयुक्त आणि घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. तसेच शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा रोड आयुक्तांची भेट घेऊन त्यांना आरोपींना अटक करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. सर्व आरोपींना अटक न केल्यास 25 जानेवारीला मीरा रोड बंद करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.