वन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास ‘महाराष्ट्र वनभूषण’ पुरस्कार

राज्यातील वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यंदापासून २० लाख रुपयांचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्य सरकारने तसे आदेश दिले आहेत.त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तयार करण्यात आली आहे.

वनक्षेत्रामध्ये जैव विविधता संगोपन, वन्यजीव संवर्धन, वनसंरक्षण, मृद व जलसंधारण, दस्तऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण इत्यादि क्षेत्रांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य वापर करणे. त्याद्वारे लोकजागरण करणे, लोक चळवळ उभारणे अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यास अनुसरुन शासन निर्णय जारी केला आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणा-या व्यक्तींना “महाराष्ट्र वनभूषण” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पुरस्कार शोध आणि छाननीसाठी वनविभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक सदस्य सचिव असलेली आठ सदस्यीय समिती असेल. गैरसरकारी संसाधनांचा वापर करून लोकजागर व लोकचवळीतून वन आणि वनिकी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल.यासाठी जैवविविधता संगोपन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, मृदा व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर, पर्यावरण सजगता, महत्त्वाचे दस्ताऐवजीकरण, वनेतर क्षेत्रामध्ये वनीकरण आदी शाखांमध्ये उल्लेखनीय आणि असाधारण काम केलेल्या व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. या पुरस्कारासाठी शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी अर्ज करू शकणार नाहीत.

पुरस्काराकरिता निवड समितीने शिफारस केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देण्याबाबत शासन अंतिम निर्णय घेईल. पुरस्काराचे स्वरूप आणि निकष यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासनाचे असतील, असे शासन आदेशात म्हटले आहे.