काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा आणखी एक धक्का ठरेल. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांच्याप्रमाणे काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांमध्ये एकाने वाढ होईल. प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती धरण्याचे संकेत मिळत आहेत.
एकीकडे काँग्रेस शक्तीप्रदर्शन करत असताना मुंबईतच पक्षाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची मुलगी प्रिया दत्तला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदार केलं होतं. मात्र, आता प्रिय दत्त काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जाईल.
प्रिया दत्त या २००९ च्या निवडणुकीत उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपाच्या पूनम महाजन यांनी हरवलं होतं. एकेकाळी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर प्रिया दत्त यांची घट्ट पकड होती. परंतु, २०१४ मधल्या मोदी लाटेनंतर काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागल्याने सक्षम उमेदवार असूनही प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांच्यासमोर टिकाव लागला नव्हता.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सांगता सभा मुंबईत पार पडल्यानंतरही मागील काही दिवसांपासून काँग्रेसला लागलेली घर घर कमी होताना दिसत नाहीये,माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर माजी खासदार प्रिया दत्तही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले आहेत. तर, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
