सर्वांचे लक्ष एकच आहे, महायुतीला विजयी करणे आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरु झाली. आता राज ठाकरे खरंच महायुतीत सामील होणार का? अमित शाहांसोबत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला. यावर फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले राज ठाकरे यांची अमित शाह यांची भेट झाली आहे. मला असं वाटतं आत्ता या विषयावर काहीही प्री-मॅच्युअर बोलण्यापेक्षा एक-दोन दिवस वाट पाहा. लवकरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, त्यानंतर आम्ही तु्म्हाला नीट सविस्तरपणे समजावून सांगू, अशा सूचक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र, अजूनही महायुतीतील जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यावरही फडणवीस यांनी भाष्य केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माढा असेल किंवा बारामती असेल, सर्वांचे लक्ष्य एकच आहे. ते म्हणजे, महायुतीला मजबूत करणे आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणे. त्यामुळे थोडे काही डिफरन्सेस असतील, तर ते दूर झाले पाहिजेत. मी एवढेच सांगेन की, ज्या माझ्या बैठका झाल्या आहेत, त्या अतिशय सकारात्मक झाल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढली. त्यांनी कोणत्याही पक्षाशी युती केली नाही. महापालिकेपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राज यांची भूमिका एकला चालो रे राहिली आहे. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत आल्यास त्यांच्या अलायन्सच्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज या महायुतीत येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महायुतीमुळे मनसेला उभारी मिळू शकते

मनसेच महायुतीत स्वागत करण्यासाठी महायुतीतील नेते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे, मनसे हा पक्ष सध्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं बोललं जातंय. कारण मनसेच्या इतिहासात लोकसभेत अजुन एकही खासदार नाही. विधानसभेचं बोलायचं तर २००९ साली चागंली बाजी मारत १३ आमदार निवडणून आले होते. नाशिक महानरपालिकेवर तर एकहाती सत्ता मिळवली होती. पण त्यानंतर पक्षाला उतरती कळा आली. सध्याचं चित्र सांगायचं तर राज्यात पक्षाचा केवळ एक आमदार आहे. अशात जर मनसे महायुतीत सामील झाला आणि बाळा नांदगावरकांना खासदारकी मिळाली तर पक्षाला केंद्रात आवाज मिळेल आणि पक्ष पुन्हा उभारायला संधी मिळेल.

त्यात राज ठाकरे यांच्या वाट्याला लोकसभा निवडणुकीत फारशा जागा येणार नसल्या तरीसुद्धा महायुतीत विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना चांगल्या जागा मिळू शकतात, असं बोललं जातंय आणि विधानपरिषद आणि विधानसभेत महायुतीचा साथ मिळाल्यानं मनसेला पुन्हा एकदा उभारी मिळू शकतो आणि मनसेला अच्छे दिन येऊ शकतात.