राज्यावर उष्माघाताचे संकट; उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताचे ४१ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रात उन्हाचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची चाहूल लागत आहे. सकाळपासून उष्ण वारे वाहत असल्याने दमटपणा वाढला आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे. राज्यात काही ठिकाणी सकाळी आणि रात्री उष्ण हवा जाणवत आहे. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. या सोबतच पुढील तीन महिन्यात राज्यात अणखी तापमान वाढणार असल्याचं म्हटलं आहे.

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक ५ रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली असून, पुण्यातही ३ रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.

वातावरणाच्या खालच्या स्तरात हवेची एक द्रोणीय रेषा दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. ही द्रोणीय रेषा विदर्भावरून जाते. तसेच अरबी समुद्रावर एक प्रती चक्रवाताची स्थिती तयार झाली आहे. या वातावरणाच्या स्थितीमुळे पुढील तीन दिवस विदर्भात तापमानात वाढ होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाटेचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमान वाढीसह रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे.

सोमवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज असून संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर खानदेश, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात सध्या जरी उष्णतेची लाट असली तरी उद्यापासून राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलीय. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळ यांनी दिली आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं ढगाळ वातावरण राहून जर काही ठिकाणी थोडा पाऊस पडला तरी उष्णता कमी होईल, त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळेल.