राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशात निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल रात्री बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,निवडणुकीच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी आम्ही दररोज सर्व माहिती घेतो. प्रलंबित कामांसाठी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेत त्यांना कामे पूर्ण करण्याच्या सूचना देत असतो. आपलं सरकार सामान्य जनतेचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिलं आहे.
पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव , विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो . त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल. कुठे गारपीट, कुठे अवकाळी पाऊस याची माहिती जाणून घेतो. यानंतर या अधिकाऱ्यांना पंचनामे, सर्वेक्षण व मदत करण्याचे निर्देश देतो. त्यामुळे निवडणुका असल्या तरी बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यावेळी दिली.
