तुमचा दुधाने अभिषेक करायचा आहे; मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिका बदलण्यावर टीका केली आहे.

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं की, आमदार आदरणीय उद्धवजी ठाकरे आपण शिवसेनेची धुरा हातात घेतल्यापासून (माफ करा आत्ताचा आपला उबाठा गट) कधीही सेनेच्या भूमिकेला छेद देऊन राजकारण केलेले नाही. मंत्रीपद, सत्ता, मुख्यमंत्री पद (स्वतःला) यासाठी आपण कधी भाजपा बरोबर युती केली तर कधी युती तोडली. नंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपण सेनेचे पारंपरिक शत्रू असलेले आणि संपूर्णतः विरोधी विचारधारा असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (म्हणजे आत्ताचा शरद पवार गट) बरोबर आघाडी केलीत मात्र सेनेला मुख्यमंत्री पद मिळवून दिलेच.

आपल्यासारखा इतका सच्चा, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा आणि सत्तेचा अजिबात मोह नसलेला व्यक्ती आजच्या राजकारणातच काय तर या पृथ्वीतलावर सापडणे दुर्मिळ. याच आपल्या गुणांसाठी, तुमचे महाराष्ट्रावर असलेले ऋण फेडण्यासाठी कृतज्ञता म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्राच्यावतीने आपला दुधाने अभिषेक करू इच्छितो (जसा नायक सिनेमात अनिल कपूरचा केला गेला होता) तरी आपण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना यासाठी आपली वेळ द्यावी, ही नम्र विनंती…!!!

यासोबतच टीप म्हणत त्यांनी पुढे लिहिलं आहे की, निवडणुकांच्या आपल्या व्यस्त दिनक्रमात आपण वेळ न देऊ शकल्यास आपल्या फोटोला आम्ही दुधाने अभिषेक घालून समस्त महाराष्ट्राची इच्छा पूर्ण करुच. असे त्यांनी लिहिलं आहे.