जन्मतः दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री

जन्मतः दोन्ही हात नाही.. पण तरीही अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकल्याची जिद्द पाहून खुद्द मुख्यमंत्रीही भारावले आहेत. नियतीने जरी हात हिरावले, तरी चिमुकल्याने आपली इच्छाशक्ती कायम ठेवली. या चिमुकल्याने सुद्धा इतर मुलांप्रमाणे एक मोठं स्वप्न पाहिलं.. ते स्वप्न आहे, भारतीय सैन्यात भरती होण्याचं… आणि त्याच्या याच जिद्दीला सलाम करत मुख्यमंत्री देखील त्याच्या मदतीला धावून आले आहेत. चिमुकल्याचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

काही दिवसापूर्वी गणेशला अपंगत्व आहे त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु सदर आजार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घालून दिली. साहेबांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली पहिल्या टप्प्यामध्ये 5 लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम पाय बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठा होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि शत्रूंना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले, तर संवेदनशीलता राखत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला.