सून म्हणून आल्या तरी बाहेरचं म्हणणार नाही; अजित पवारांचं शरद पवारांवर निशाणा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या बारामती मतदार संघात सध्या पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. याचं पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार पलटवार करत निशाणा साधला.

अजित पवार आज बारामती,दौंड आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. तिन्ही ठिकाणी अजित पवार डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार आहेत. दौऱ्याची सुरुवात इंदापूरपासून केली आहे. इंदापूरमध्ये अजित पवार वकील आणि डॉक्टरांचा मेळावा घेत आहेत. अजित पवार इंदापुरात पोहोचले त्यांच्यासोबत आमदार दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, प्रदीप गारटकर, प्रवीण माने उपस्थित आहेत.

डॉक्टरांशी बोलताना एका महिला डॉक्टरचे नाव घेत अजित पवार यांनी म्हटलं की, “तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहे.” घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा जोरदार पलटवार करत निशाणा साधला.

गर्भपात आणि मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बीडमध्ये काय आणि किती प्रकार चालतात ते तुम्हाला माहितीय. पण अशा घटना घडू नये. काही जिल्ह्यात एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळी जन्माला येतील साडे आठशे मुली जन्माला येत होते. सातशे नव्वदपर्यंयत हे प्रमाण आहे. भविष्यात तर सगळं अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग त्यावेळी कधी येऊ शकतो. यातला गमतीचा भाग जाऊद्या. गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मला कुणाचा अपमान करायचा नव्हता.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येत. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत तुम्ही खासदाराला निवडून दिले आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिलं तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीच हा खासदार उजवा असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.