श्रद्धा वालकरने तुळींज पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेण्यात कोणताही दबाव पोलिसांवर नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. श्रद्धाने तुळींज-नालासोपारा पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रार मागे घेतली. यासाठी पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नव्हता असेही फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
आज सभागृहात श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या चर्चेची सुरुवात करताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा होती. हा दबाव राजकीय होता का, असा प्रश्न उपस्थित केला. अमरावती येथे कोल्हे प्रकरण घडले. त्यावेळी एनआयएने प्रकरण हातात घेतल्यानंतर हत्येचे खरे कारण समोर आले. त्यामुळे श्रद्धाने तक्रार मागे घेण्याबाबत त्यावेळीचा सरकारमधील प्रमुखांचा दबाव होता का? असा प्रश्न भातखळकरांनी उपस्थित केला.
त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे आहे. तिच्या वडिलांची माझी भेट झाली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मला सांगितला. गुन्हेगाराने ज्या फ्रीजमध्ये तुकडे ठेवले होते तिथंच ठेवलेले कोल्ड्रिंक पित होता. या प्रकरणात राजकीय दबाव आढळून आलेला नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. श्रद्धाने तक्रार दिली आणि एक महिन्यानंतर अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एक महिन्यात पोलिसांनी काय करवाई केली याची चौकशी करत आहोत. आम्ही पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखली समिती नेमली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
23 नोव्हेंबर 2021 ला श्रद्धाला मारहाण झाली होती त्याबाबत तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मग एक महिन पोलीस काय करत होते असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार उपस्थित केला. वालकर यांच्या सेटलमेंटच्या पत्रावर खाडाखोड असल्याचा मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. त्यावर, एक विशेष पथक तयार करुन चौकशी केली जाईल अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
