संजय निरुपम एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश करणार

काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते संजय निरुपम यांनी आपल्या पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून निरुपम यांनी काँग्रेसवर अनेक मोठे आरोप केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी निरुपम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस सोडल्यानंतर संजय निरुपम मुंबईच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात होते. मात्र, त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय निरुपम हे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढवण्याबाबत इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांनी याबाबत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच काँग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केली होती. यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यानंतर आता ते तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा एकदा घरवापसी करणार आहेत.

संजय निरुपम शुक्रवार, 3 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय निरुपम यांचा पक्षात समावेश करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. संजय निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांचे शेकडो समर्थकही त्यांच्यासोबत असतील.

दोन दिवसांपूर्वी निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होती.या भेटीनंतर संजय निरुपम यांनी शिवसेना प्रवेशाची माहितीत्यांनी दिली होती. या भेटीदरम्यान पुढे काय करायचे? यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रवेशासंदर्भातील बाकी सविस्तर माहिती ही पक्षाकडून देण्यात येईल. तसेच पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे जेवढेही लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रचार करणार असून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.