लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरात सुरु केला आहे. या दरम्यान दोन्ही उमेदवारांच्या अडचणी वाढवणारा प्रकार घडला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक आयोगने नोटीस बजावली आहे. खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून आल्याने ही नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना दोन दिवसांत खुलासा करण्याचे सांगितले आहे. 48 तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी झाली. त्यात सर्व 38 उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. त्यात राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा 28 एप्रिलपर्यंतचा 37 लाख 23 हजार 610 रुपयांचा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र उमेदवारां खर्च प्रतिनिधीने दाखविलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केली. यावेळी एक लाख तीन हजार 449 रुपयांची तफावत आढळल्याचं निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवलं. उमेदवाराने दिलेला खर्च योग्य वाटत नसल्याचं नोटीसीत म्हटलं आहे. दरम्यान प्रतिनिधीने ही तफावत अमान्य केली आहे. त्यामुळे येत्या 48 तासांत खुलासा करण्याची सूचना करण्यात आली आहे.
चार उमेदवारांना नोटिसा बारामती मतदारसंघातील उमेदवारांची खर्चाची पहिली तपासणी २५ एप्रिलला झाली होती. त्यात ३८ पैकी चार उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या तपासणीपूर्वी खुलासा करण्याचे त्यात म्हटले होते. दुसऱ्या खर्च तपासणीवेळी सर्व उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.
वडणूक आयोगाने याबाबत दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दोन्ही उमेदवारांना दिले आहे. याबाबत जिल्हा खर्च निरीक्षण समितीकडे दाद मागीतली जाणार आहे. सध्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यन्त पोहचण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवार करत आहे. त्यांचे भवितव्य ७ मे रोजी ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
