मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजघडीला फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या 11 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 195 गावांना पाणीटंचाईच्या सामना करावा लागत आहे. एक हंडा पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना आपल्या लहान लेकरांना घेऊन डोंगराळ भागातून पाणी घ्यायला जावं लागत असल्याची परिस्थिती आदिवासी पाड्यांवर पाहायला मिळत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील भूजल पातळी ही साडेपाच फुटांपर्यंत खाली गेल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाभरातील अनेक विहिरी आणि हातपंप आटल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे.
पाण्याचे टँकर भरण्यासाठी व विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या विभागातील 2 हजार 83 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 304, जालना 413, परभणी 38, हिंगोली 49, बीड 322, नांदेड 57, लातूर 272 तर धाराशिव जिल्ह्यात 628 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. टँकरसाठी 727, टँकर व्यतिरिक्त 1356 अशा 2083 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पातील 3 धरणात 0 टक्के पाणीसाठा
जायकवाडी – 8 टक्के
येलदरी – 30 टक्के
सिद्धेश्वर – 2 टक्के
माजलगांव – 0 टक्के
मांजरा – 3 टक्के
उर्ध्व पैनगंगा – 41 टक्के
निम्न तेरणा – 0 टक्के
निम्न मनार – 27 टक्के
विष्णूपुरी – 30 टक्के
निम्न दुधना – 0 टक्के
सिना कोळेगांव – 0 टक्के
