मुंबईतील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) मेट्रो 3, एक्वा लाइनचा पहिला टप्पा सुरू करण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार, मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा जुलैपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यात आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान मेट्रो धावणार आहे. सध्या आरे डेपोचेही 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे. आरे डेपो 30 हेक्टरमध्ये पसरलेला आहे, त्यापैकी स्टेशन आणि डेपोमध्ये 25 हेक्टर जागा व्यापलेली आहे आणि उर्वरित 5 हेक्टर इतर वापरासाठी आहे. जिथे मेट्रोच्या देखभाल, संचालन, प्रशासन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत.
मुंबईकरांना लवकरच भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो 3 कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यावर मेट्रोची एकात्मिक चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता लवकरच संशोधन डिझाइन आणि आरडीएसओ ची चाचणी सुरू होणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच मुंबई मेट्रो ३ सुरू होण्याची शक्यता असून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
एमएसआरसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोची पहिली चाचणी पार पाडल्यानंतर मेट्रोची चाचणी घेण्यासाठी मेट्रो रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशन कडे अर्ज पाठवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस ऑर्गनायझेशनची चाचणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी मेट्रोचा वेग, यंत्रणा, सुरक्षा आणि रोलिंग स्टॉक तपासला जाणार आहे.आरडीएसओ कडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अंतिम सीआरएस चाचणीसाठी अर्ज केला जाणार आहे. त्यानंतर जुलैपर्यंत मुंबई मेट्रो 3 सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली होती, पण आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरून वाद निर्माण झाला. कारशेडसाठी आरेमधली झाडे तोडण्याला शिवसेना, काही पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला. 2019 मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला ब्रेक लागला. तसेच कारशेडसाठी कांजूरमार्गमधल्या पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी जोर धरू लागली. कांजूरमार्गची जागा खासगी व्यक्तीची आहे का? यावरूनही वाद होता. अखेर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले.
मविआ सरकार घालवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्वरित या कामाला मंजुरी दिली. शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आरे येथेच करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, कार डेपोच्या मुद्द्यामुळे प्रकल्पाला तीन वर्षांचा विलंब झाला होता.
