देवेंद्र फडणवीस यांची नजर आणि सत्यजीत तांबे महिन्यात आमदार

7 डिसेंबर 2022 राेजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांच्यावर नजर असल्याचे सांगत आमदारकीचे स्वप्न दाखविले आणि एक महिन्यात सत्यजीत तांबे यांचे हे स्वप्न पूर्णही झाले आहे.

सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 7 डिसेंबर राेजी झाला. या कार्यक्रमात बाेलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले हाेते,सत्यजित तांबे यांना मी अनेक वर्षांपासून बघत आहे. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जे वेगळेपण असते, ते सत्यजित मध्ये पाहायला मिळत. बाळासाहेब थोरात तुमच्याकडे एक तक्रार आहे. सत्यजित सारखे नेते तुम्ही कितीदिवस बाहेर ठेवणार आहात. सत्यजितला जास्त दिवस बाहेर ठेऊ नका नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे कारण चांगली माणसं जमाच करायची असतात.

राज्याच्या राजकारणात यामुळे खळबळ उडाली हाेती. माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थाेरात यांचे भाचे आणि विद्यमान आमदारांचे पुत्र असलेले सत्यजीत हे काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्याही जवळचे मानले जातात. राहूल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेतील महत्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली हाेती. त्यामुळे ही केवळ राजकीय टाेलेबाजी असावी अशी चर्चा हाेती. मात्रआज घडलेल्या घडामाेडींमुळे फडणवीस यांनी मास्टरस्ट्राेक लगावत आपला शब्द खरा केला आहे.