२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष बहुतांश वेळा सत्तेत राहलेले पक्ष आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तेव्हा कॉँग्रेसने वैचारिक अडचण असताना केवळ सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याबद्दल वेगळे सांगायला नको हे सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकतात त्यांच्या प्रमुख नेत्यांचा आणि पक्षाचा इतिहास पाहिल्यावर हे लक्षात येते.
आता जे सत्तेच्या बाहेर बसलेले आहे, त्यांनी साटेलोटे करून अडीच वर्ष सत्ता मिळवली होती. त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे त्यामुळे त्यांची अस्वस्थता आहे. ती म्हणजे पुढेही त्यांना आपली सत्ता येताना दिसत नाहीये. ही त्यांची अडचणीची गोष्ट आहे. खरंतर विरोधी पक्षाला स्वतःच्या पक्ष संघटनेवर, नेतृत्वावर विश्वास असतो, त्यांना एक आशा असते की, आपण सत्तेत येणार आहोत. हा अनुभव भाजपमध्ये आपल्याला चांगला बघायला मिळतो. इतके वर्ष विरोधी बाकावर असताना त्यांच्या पक्ष कधी फुटला नाही. अलीकडच्या काळातले सांगायचे झाले तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी चोख भूमिका बजावली तसेच भाजपचे इतर नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आपली बाजू वेळोवेळी त्यांचं पद्धतीने लावून धरत असायचे.
सध्याच्या विरोधी पक्षनेत्यांची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे यांना विरोधात बसायची सवय नाहीये, त्यांच्या संस्था ह्या सरकारी मदती वरच्या संस्था आहे. त्यांनी स्वातंत्र्यपणे संस्था,उद्योग उभे केलेले नाही. विशेष म्हणजे हे सगळे जुने नेहरू मॉडेल आहे. १९८० नंतर इंदिरा गांधी यांनी एक चाल खेळली होती. एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना निधी द्यायचा म्हणजे त्या संस्था त्यामध्येच अडकून राहतील आणि मूळ राजकारणापासून दूर जातील असे त्यांचे तत्व होते. हे आजवर चालले पण आता यांनाच विरोधी बाकांवर बसायची वेळ आली. आता विरोधी पक्षांनी सरकार बदलल्यावर काय करायचे याचा विचार त्यांनी कधीच केलेला नव्हता.
२०१९ ला केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने आले. विरोधी पक्ष भाजपला विशेषतः मोदी-शहा, देवेंद्र फडणवीस यांना हे संघांचे आहे असे वर-वर बोलून विरोध करत असला तरी विरोधी पक्षाची खरी अस्वस्थता इथे आहे की, भाजपच्या नेत्यांची राजकारणाची शैली जरा वेगळी आहे. शिस्तप्रिय व तळागाळातल्या शेवटच्या घटकाला न्याय देणारी…तीच मविआच्या नेत्यांना रुचत नाहीये. त्यामुळे मग ते पंकजा मुंढेंना, एकनाथ खडसेंना विनोद तावडेंना उचकायचे, एखादा नेता एखादया जातीचे नेतृत्व असे बोलायचे. पण मुळात अशी पद्धती भाजप मध्ये नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आपले नवीन नेतृत्व समोर आणले असते, त्यांच्यावर विश्वास दाखवला असता तर ही अस्वस्थता त्यांच्यावर आली नसती. नवीन राजकारण नवीन शैलीने करावे लागेल हे लक्षात घ्यायला विरोधी पक्ष जोपर्यंत तयार नाही, तोपर्यंत यश मिळणार नाही. जुन्या पद्धतीचे राजकारण, जातीपातीचे राजकारण हे विरोधी पक्षाने सोडून नवीन गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
