विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : “त्रिभाषा सूत्र ही संकल्पना काँग्रेसने १९६५ सालीच आणली होती आणि १९६८ मध्ये काँग्रेस सरकारने त्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच सुरू झाली,” असा आरोप राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.
(Three-Language Formula Introduced by CongressApproved During Uddhav Thackerays Tenure – Ashish Shelar Alleges)
कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांवरही टोला लगावत म्हटले, “संजय राऊत उद्धव ठाकरेंना पडद्याआड ठेवण्याचा कितीही प्रयत्न करत असले, तरी इतिहास पुसता येत नाही. त्यावेळी घेतलेले निर्णय आजही स्पष्टपणे दाखवत आहेत की त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचा प्रारंभ महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला.”
शेलार म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा आणि बदलण्याचा अधिकार आहे. मात्र सध्या राज्यात केवळ मराठी ही एकमेव बंधनकारक भाषा आहे, हिंदीसकट अन्य भाषा पर्याय रूपाने आहेत. त्रिभाषा सूत्र ही अभ्यासपूर्ण शैक्षणिक रचना आहे, जी सुकाणू समितीच्या शिफारशी आणि तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर अंमलात आणली गेली. त्यावर मतभेद असू शकतात, पण विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन हिताला नाकारता येणार नाही.”
शेलार यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका करत सांगितले की, “पाचवी, सहावी, सातवी वर्गांमध्ये हिंदी सक्ती काँग्रेसच्या काळातच करण्यात आली आणि त्याला उद्धव ठाकरे सरकारने पाठिंबा दिला होता. मात्र आज भाजपाने ही सक्ती हटवून विद्यार्थ्यांना पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी उत्तर द्यावे, अन्यथा मीच त्यांना या विषयावर ट्यूशन देण्यास तयार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी वर्धा ते गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला काही भागांतून शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, “हा महामार्ग कोणत्याही गावी अन्याय करून उभारला जाणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या भावना ऐकून घेणार आहोत. आमचा विकासाचा दृष्टिकोन हा मानवतेच्या अधिष्ठानावर आधारलेला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊनच प्रगतीची दिशा आखली जाईल.”
“राज्याच्या भविष्यासाठी उपयोगी पडणाऱ्या या प्रकल्पावर निर्णय घेताना अर्थ खात्याच्या सूचनांचा आणि संभाव्य परिणामांचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
