राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दोनदा भेट झाली आहे.
एमसीएच्या निवडणूक काळात आणि नंतर शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया झाली त्यावेळी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. याच कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती असणार आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमात काय घडामोडी घडतात शिंदे-पवार काय बोलतात याचीच राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्याकरता स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी दिवंगत वसंतदादा पाटील यांनी केली आहे. 1956-57 मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्यावेळी त्यांनी स्वतः शेतामध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते.
सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह वसंतदादांनी धरला होता. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग आणि मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. वसंतदादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करुन संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.
