हिंदुत्ववादी मते भाजपकडे जाऊ नयेत यासाठीच चिंचवड मध्ये राहुल कलाटेंना उभे करण्याची खेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले. राहुल कलाटे उभे राहिल्यामुळे भाजपचा विजय झाला असा भ्रम काही जण पसरवत आहेत. पण हे सत्य नाही. 2019 ला पहिल्यांदा हा प्रयोग करण्यात आला. राहुल कलाटेंना सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे केले होते. पण ते 38 हजारांच्या फरकाने हरले.
त्यावेळी हा प्रयोग का झाला होता? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांना उभं केलं तर शिवसेनेची जी हिंदुत्ववादी मतं आहेत ही सरळ भाजपकडे जातील म्हणून त्यांना अपक्ष उभं केलं होते. यावेळीही राहुल कलाटे उभे राहिले, त्यामागेही हेच डिझाईन होतं. ते जर उभे राहिले नाहीत तर हिंदुत्ववादी मतं शिवसेनेकडे जातात ती सगळी मतं भाजपकडे जातील म्हणून त्यांना उभं करण्यात आलं आणि त्यांनी मतं घेतली. ती सगळी मते महाविकास आघाडीला गेली नसती. ते उभे राहिले नसते तर 60-65 टक्के मते भाजपला मिळाली असती. ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्ट्रॅटजी होती. त्यातूनच त्यांनी कलाटेंना उभे केले.चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचा 36 हजार मतांनी विजय झाला. चिंचवडच्या जनतेने लक्ष्मण जगताप यांना या विजयातून श्रद्धांजली अर्पण केली आहे असेही फडणवीस म्हणाले.
