“महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची” ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य अतुल भातखळकर, संजय कुटे, यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.
विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
