राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना सक्तवसुली संचलनालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आज दिवसभरात आमदार मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी केली आहे. या चौकीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. मुश्रीफ यांना सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आज दिवसभरातील कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोमवारी थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आज (11 मार्च) कागलमध्ये तिसऱ्यांदा छापेमारी केली. त्यामुळे मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी चर्चा आहे. आज कागलमधील निवासस्थानी मुश्रीफ यांच्या कुटुबीयांची साडे नऊ तास कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले.
नलावडे साखर कारखान्याप्रकरणी काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा मारला. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. पहाटेच ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तसेच बाहेरच्या लोकांना आत प्रवेश नाकारला जात होता. आधी ही हसन मुश्रीफ यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. असे असले तरी आता सध्या कागल मधील राजकारण चांगले तापले असून वातावरण देखील तणावपूर्ण झाले आहे.
