सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल्स आहेत? रामदास कदमांनी वाचला मालमत्तेचा पाढा

खेड : खेडच्या सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोकाची टीका केली आहे. खोक्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी ठाकरेंच्या परदेशात कुठे-कुठे आणि किती मालमत्ता आहेत, याचा पाढा वाचला.

रामदास कदम म्हणाले की, आमचे खोके काढण्यापूर्वी कुणाचे श्रीलंकेत, लंडनमध्ये हॉटेल्स आहेत. अमेरिकेत कुणाची प्रॉपर्टी आहे, हे मी काढणार आहे. एकदिवस मी राज्यासमोर हे सगळं काढणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, माझ्याशिवाय उद्धव ठाकरे कधीच बाहेर पडायचे नाही. मी कायम सोबत असायचो. परंतु अशी वेळ आली की त्यांनीच मला पाडण्यासाठी प्रयत्न केले. दापोलीमध्ये योगेश कदमला पाडण्यासाठी त्यांनी काम केलं. याचे पुरावे आपल्याकडे असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

पुढे कदम म्हणाले कि, आज तुम्ही जो खोक्यांवर आरोप लावता त्याच रामदास कदमने कोकणामध्ये खोकेच्या खोके वाटून तुमची उंची वाढवली होती. तुम्हाला आता लाज वाटत नाही का? आमच्याकडे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कुणाचे हॉटेल श्रीलंकेला तर कोणाचे लंडनला आहे तर कोणाची मालमत्ता अमेरिकेत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळल्याशिवाय राहणार नाही खोक्यांची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? असा सवाल कदमांनी यावेळेस केला.

”बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. एवढंच उद्धव ठाकरे हे खरं बोलत आहेत. अन्यथा ते सर्व खोट बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी शिवसेना बंद करेल. मग आता उद्धव ठाकरे यांनी वडीलांचा आपमान केला. उद्धव ठाकरे यावर का बोलत नाहीत”, असा सवाल त्यांनी केला.