पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना गोळ्या घालण्याची धमकी; ३० लाखांची मागितली खंडणी

काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना अज्ञात नंबरवरून फोन आणि मेसेज करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी आयपीसी ३८७, ५०७ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान नऊ वाजण्याच्या दरम्यान भवानी पेठ येथे घडली.

याप्रकरणी अविनाश रमेश बागवे यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात मोबाईल नंबर धारकाने बागवे यांना फोन केला. तसेच मेसेज केले. त्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. निवडणुकीमध्ये उभे न राहण्याची तसेच राजकीय करियर नष्ट करण्याची धमकी देखील फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिली यासोबतच त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर करीत आहेत.