मीडिया, मनोरंजन आणि जनजागृतीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ॲमेझॉन इंडिया यांच्यात भागीदारी करार झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज याची घोषणा केली.
अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की, भारत ही एक प्राचीन संस्कृती असल्यामुळे, भारताकडे आजपर्यंत कधीही न सांगितल्या गेलेल्या लाखो कथा आहेत. या कथा कालातीत असून, अध्यात्मा पासून ते सॉफ्टवेअर पर्यंत, परंपरांपासून ते ट्रेंड पर्यंत, लोककथांपासून ते सणांपर्यंत, आणि ग्रामीण भारतापासून ते उगवत्या भारतापर्यंतचे विस्तृत क्षेत्र या कथांमध्ये सामावले आहे. अलीकडेच भारतीय आशयाने आंतरराष्ट्रीय मंचावर यश मिळवले आहे आणि भारतीय कलाकारांनी परदेशी प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.सरकारने भारतीय मनोरंजन उद्योगाचे, विशेषतः ओटीटी सारख्या नवीन व्यासपीठाचे सामर्थ्य आणि त्यापुढील संधी ओळखल्या आहेत. मंत्रालयाने दृकश्राव्य सेवांना चॅम्पियन सेवा क्षेत्र म्हणून मान्यता दिली असून, अलीकडेच ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसाठी स्वयं-नियामक चौकट निश्चित केली आहे.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि सत्यजित रे भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, मास्टरक्लास आणि इतर संधींच्या तरतुदींद्वारे औद्योगिक-शैक्षणिक संबंध मजबूत होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे भारतामधील प्रतिष्ठित चित्रपट संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या प्रतिभावान कलाकारांचा संघर्षाचा कालावधी कमी व्हायला मदत होईल, असेही ठाकूर म्हणाले. अभिनेता वरुण धवन यांनी तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या स्ट्रीमिंग सेवांबद्दल सांगितले. स्ट्रीमिंगच्या माध्यमातून भारतीय चित्रपट आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे असे सांगून ते म्हणाले, या स्ट्रीमिंग सेवांनी भारतात तयार झालेल्या आशयाला अकल्पनीय अशी पोहोच आणि उपलब्धता दिली आहे. नवीन अभिनेते आणि निर्माते, नवीन प्रतिभा जे आतापर्यंत मुख्य प्रवाहापासून दूर होते ते आता जगभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ॲमेझॉन यांच्यातील भागीदारीमुळे भारतीय प्रतिभेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल.
