कोलकाताविरूद्ध सलग दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार बंगळुरू

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लीग स्टेजचा सामना रंगणार आहे. सामना कोलकातामध्ये संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. केकेआरचे हे घरचे मैदान आहे. कोलकाता संघ 2019 नंतर प्रथमच येथे खेळणार आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी बाद फेरीचे सामने खेळण्यात आले होते. मात्र त्याआधी केकेआर लीगमधून बाहेर पडला होता. दुसरीकडे, गेल्या वर्षी आयपीएलच्या टप्प्यात केकेआर आणि आरसीबी आमनेसामने होते. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा विजय झाला होता.

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये 31 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी सर्वाधिक सामने ही कोलकाताने जिंकले आहेत. कोलकात्याच्या संघाने बंगळुरुच्या संघावर 17 वेळा विजय मिळवला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकात्याला 14 वेळा धुळ चारली आहे.

कोलकाता संघाला या वर्षी श्रेयस अय्यर व शाकीब उल हसन या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. अय्यरला दुखापतीवर शस्त्रक्रियेसाठी परदेशात जावे लागणार आहे, तर शाकीब याने कौटुंबिक व आंतरराष्ट्रीय व्यग्र वेळापत्रकाचे कारण देत आयपीएलमधून माघार घेतली आहे. अय्यरऐवजी नितीश राणा याच्याकडे कोलकाता संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने दिल्लीसाठी नेतृत्व केले आहे; पण मोठ्या स्तरावर त्याच्याकडे अनुभवाची कमतरता प्रकर्षाने दिसून येते. याच कारणामुळे कोलकात्यासाठी यंदाचा मोसम खडतर असण्याची शक्यता आहे.