मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकी प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई कनेक्शन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. लॉरेन्स बिश्नोईचा व्हिडिओ बघितला आणि नशेत संजय राऊत यांना धमकीचा मेसेज केला, असा हा प्रकार घडल्याचे पोल्स तपासात निष्पन्न झाले आहे.
परिमंडळ सात चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पत्रकार परीषद घेऊन यात फक्त राहुल तळेकर हा २३ वर्षांचा एकच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगितलं. राहुल तळेकर मूळचा जालन्याचा रहिवासी असून पुण्यात वडगाव शेरी येथे एक छोटे हॉटेल चालवतो. संजय राऊत यांची एक बातमी त्याने बघितली. त्यानंतर नशेत लॉरेन्स बिश्नोई याचेही व्हीडीओ बघितले. त्यानंतर इंटरनेट वरून संजय राऊत यांचा संपर्क क्रमांक काढून त्यांना धमकी देणारा मेसेज नशेत केल्याचे त्याने पोलीसांकडे कबूल केले. त्याची आज ठाणे जेल मधून जामिनावर मुक्तता झाली आहे. राहुल तळेकर हा देखील शिवसेनेला मानणारा असल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे हे सगळे धमकी प्रकरण नशेतच झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
