
महाराष्ट्रात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगलेला दिसून येत आहे. हे अधिवेशन 5 दिवसांचेच जरी असले, तरी यामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये परीक्षा घोटाळा, ओबीसी आरक्षण, एसटीसंप आणि इतर महत्वाच्या विषयांचा समावेश देखील आहे.
आज सुरु झालेल्या या अधिवेशनात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात खडाजंगी झाल्याचे दिसून आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले कि, “या सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही. स्वत:च्या आमदारांवर अविश्वास असलेले सरकार आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर बघितले नाही” अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या स्थापनेपासून जी परंपरा होती, ती बदलण्याचा अट्टहास का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
या सरकारमधील एकही परीक्षा घोटाळ्यांशिवाय होत नाही :
परीक्षा घोटाळ्यांवर निशाणा साधत फडणवीस यावेळी म्हणाले कि, “या सरकारमधील एकही परीक्षा घोटाळ्यांशिवाय होत नाही. परीक्षा घोटाळ्यांविषयी पहिल्याच दिवशी चर्चा झाली पाहीजे.”
“श्रद्धेय अटलजींच्या नावावर खोटे बोलू नका” :
यावेळी अध्यक्ष निवडणूकीबद्दल सरकारवर टीकास्त्र सोडत फडणवीस म्हणाले कि, “ज्या सरकारकडे 170चे बहुमत सांगितले जाते,त्या सरकारच्या मनात अध्यक्ष निवडणुकीसाठी स्वत:च्या बहुमातावर विश्वास का नाहीृ. नियम बदलविले तर किमान त्याचा सभागृहासमोरील विचाराचा कालावधी कमी करता येणार नाही.महाराष्ट्राच्या इतिहासात इतके असुरक्षित सरकार मी पाहिले नाही.” तसेच ते पुढे म्हणाले कि, “अध्यक्षपदाच्या निवडणुकीला श्रद्धेय अटलजी यांनी कधीही व्हीप लागू केला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा चुकीचा वापर करू नका. तुमच्या भीतीसाठी कशाला खोटे बोलता आमचा वैधानिक हक्क नाकारला, म्हणून आम्ही सभात्याग केला.”
एकूणच सध्या विरोधीपक्ष आक्रामक आहे, आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे सरकारला कठीण जात आहे. या संपूर्ण हिवाळी अधिवेशनात आणखी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार, विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यामध्ये आणखी किती प्रमाणात खडाजंगी होणार आणि विरोधी पक्षाच्या प्रश्नांना सरकार उत्तर देऊ शकेल कि नाही, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
