नाना पटोले म्हणजे राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा प्रदेशाध्यक्ष – शहाजी बापू पाटील

सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसकडे पद द्यायला माणूस नव्हता म्हणून पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केलं असून पटोले हे राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असणारे नेते असल्याची जहरी टीका देखील शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

सांगोला येथे शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणा-या बाबूराव‌ गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सत्काराचा कार्यक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमानंतर आमदार शहाजी बापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शहाजीबापू म्हणाले की, सध्या अडचण अशी आहे. आपल्या माणदेशी भाषेत एक म्हण आहे. ज्याला खालतं वरतं कळत नाही, त्याला कारभारकी. त्या नाना पटोलेले कोळं कुठं, करगनी कुठं, नाराळ कुठं, अकलूज कुठं काय माहित हाय का? काँग्रेसमध्ये अध्यक्षपद द्यायला कोणी माणूस नाही, म्हणून याला काढलाय. राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व दुर्दैवाने सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, असा टोलाही त्यांनी हाणला.

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी कर्नाटकाच्या सभेत केला होता. त्यावरही शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस मी पुन्हा येईल म्हणाले होते. त्यानुसार ते परत आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून परत येईल असं ते म्हणाले नव्हते. लबाड बोलू नका, अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी विरोधकाांना सुनावले आहे. येत्या 12 तारखेला राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. तो आमच्याच बाजूने लागेल, असंही त्यांनी सांगितलं.