पहिल्या टप्पात 30 हजार तर दुसऱ्या टप्पात 20 शिक्षक भरती करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राज्यातील जवळपास अडीच लाख उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, राज्य सरकारकडून भरतीबाबत संकेत दिल्यानंतरही पवित्र पोर्टलवर कोणत्याही हालचाली होत नसल्यानं उमेदवारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. राज्यातील शिक्षक भरती कधी होणार असा सवाल उपस्थित करुन सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे.

पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असेही मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे.

शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.

दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा आमचा विचार आहे. तर दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळणार आहे, असे केसरकरांनी म्हटले आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.

विद्यार्थ्यांच्या एकच गणवेशाबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल असंही मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.