आमचं सरकार पवार साहेबांची काळजी घेईल; मच्छर मारण्यासाठी धमकीची गरज नाही – नितेश राणे

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. लवकरच तुझा दाभोळकर होईल असे लिहित धमकी देण्यात आली आहे.याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, ताईंना मी सांगेन तुम्ही एवढी चिंता करु नका. आमचं सरकार आहे. आदरणीय पवार साहेबांची जेवढी काळजी घ्यायची तेवढी आम्ही नक्की घेऊ. त्याची चिंता नको. असे नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे नागपूरला आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकार घेत आहे. आम्ही काही उद्धव ठाकरेसारखे घरी बसून राज्याचा कारभार चालवत नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र आम्ही असे करणार नाही, असे राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मच्छर मारण्यासाठी धमकीची गरज नाही असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “आदरणिय पवार साहेबांची सगळी काळजी घेण्याची जबाबदारी ही आमच्या सरकारची आहे. तुम्ही ज्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घेत आहात… आता मच्छर मारण्यासाठी काही कोणाला धमकी देण्याची गरज नाही. पायाच्या खाली… बुट हलवला तरी तो मरतो. त्याला काही धमकीचा विषय नाही”. दरम्यान नितेश राणे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

२०२४ ला विनायक राऊत खासदार नसणार आणि संजय राऊत बाहेर नसणार. मग सत्ता कुठून येणार. टोल नाक्यावर बसून चर्चा करून सत्ता येत नाही. संजय राऊत विरोधात पत्राचाळ प्रकरण आहे. करोना केंद्र घोटाळ्याचे प्रकरण आहे. एका महिलेने तक्रार दिली आहे, त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोणत्या प्रकरणात ते आत जातील, हे येणाऱ्या काळात ठरेल, अशी टीका राणेंनी केली. औरंग्याला चाटण्याचे काम अबू आजमी आणि महाविकास आघाडीचा मुंब्राचा आमदार करतो, असेही राणे म्हणाले.