मनिषा कायंदे यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र; शिवसेनेत प्रवेश करणार

ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर आज मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मनिषा कायंदे यांच्यासोबत २ माजी नगरसेवकदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ येथे हा प्रवेश पार पडणार आहे. ठाकरे गटाचे आणखी काही आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी मोठं मोठे प्रवेश शिवसेनेत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.

कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. भाजपकडून 2009 ला सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढल्या होत्या . त्यानंतर 2012 साली त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 2018 साली त्यांना ठाकरेंनी विधानपरिषदेची जबाबदारी दिली होती .

कालच शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र सुपूर्त केलं. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नसल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. पक्षात होणारी घुसमट आपणच थांबवत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.