महाविकास आघाडीत तीन पक्षात 10 मुख्यमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीतील काही नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील काही भागात पोस्टर्स लागली आहेत. अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांचे समर्थक आपल्या नेत्यांचे बॅनर्स लावून त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता या भावी मुख्यमंत्रीदावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे किती दावेदार आहेत याची आकडेवारीच बावनकुळे यांनी सांगितली आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिल्लक सेना, किंचित सेनेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दहा मुख्यमंत्री पदाचे चेहरे असल्याचे बावनकुळे म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही टीका केली.

महाविकास आघाडीकडे 10 मुख्यमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये तर मुख्यमंत्रीपदाचे तीन दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. तर राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. ठाकरे गटात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. एकाच पक्षात तीन तीन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. असे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे एकूण 10 दावेदार आहेत. 10 मुख्यमंत्र्यांचे हे तीन पक्ष आहेत, अशी खिल्ली चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडवली आहे.

अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे हे फक्त दोन वेळा मंत्रालयात आले. त्यावेळी त्यांनी आमदारांचे काम केले नाही. त्यामुळेच 50 आमदारांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांना साथ दिली असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जूनला गद्दार दिवस साजरा केला. पण 10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी काँग्रेसशी गद्दारी करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवल्याचे बावनकुळे म्हणाले.