राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर राज्यासह देशभरात खळबळ उडाली. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या या बंडखोरीवर आणि आरोपांवर प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
सध्या अजित पवारांनी जी भूमिका घेतली, ही महाराष्ट्रहिताची, देशहिताची आहे.“छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्यांना का पक्ष सोडावा लागला? ते का बाहेर पडले? हे सगलं मांडलं. अजितदादांनी सत्य परिस्थिती मांडली. मी पवार कुटुंबाचा आहे, खोटं बोलत नाही, असं अजितदादा म्हणाले. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 90 जागा लढवणार असल्याच म्हटलं आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले की, “जागांबद्दल काय बोलण झालं? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. साधराण युतीमध्ये असं असंत” “आम्ही म्हटलं इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरं चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होतं. त्यामुळे राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.“मी स्वतः पवार कुटुंबातील असून कधी खोटं बोलू शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद करत गंभीर विधानं केली आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. असंही बावनकुळे म्हणाले.
समरजीत घाडगे नाराज नाही. ते भाजपचे निष्ठावान नेते आहेत. कसाही प्रसंग आला तरीही ते पक्षापासून फारकत घेऊ शकत नाही. उलट शरद पवारांच्या घरातच मनभेद झाले. अजित पवारांनी त्याचे दाखले दिले. शिवसेनेसोबत गेल्यामुळे पवारांचे नुकसानच झाले. आज तर अशी परिस्थिती आली की परिवारही त्यांच्यापासून दूर जात आहे. शरद पवारांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आधी त्यांनी आपले घर सांभाळावे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
