महाराष्ट्रातील ६० हजार रुग्ण ऑक्सिजन वर…!

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. महाराष्ट्राची जनता कोरोनामुळे एकेका श्वासासाठी हैराण झाली आहे. असे असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सांगितले कि, महाराष्ट्रातील ६० हजार रुग्ण ऑक्सिजन वर आहेत. महाराष्ट्रात दररोज सुमारे ६०-६५ हजार कोरोनाचे रुग्ण निघताएत, दिवसागणिक संख्या वाढत जाते आहे, असे असताना कोरोनाच्या डेथबेड वर असलेल्या रुग्णांची संख्या, ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांची संख्या वाढली तर आधीच ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे पुढे काय होणार असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे.

७६ हजार ३०० ऑक्सिजन बेड्स व २५ हजारपेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राला दररोज १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून ३०० ते ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यांतून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याऐवजी जवळपासच्या राज्यातून ऑक्सिजन पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन साठा उपलब्ध असणे गरजेचे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला पण, प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. यावेळी १३ हजार जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्स मागणीही त्यांनी केली.


ही सर्व परिस्थिती सत्य जरी असली, आणि मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मागणी केली जरी असली, तरी राज्य सरकार म्हणून आपली जी जबाबदारी आहे, ती राज्य सरकार व्यवस्थित, चोखपणे पार पाडतंय का ? असा प्रश्न मात्र सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, त्याची चाहूल सुमारे फेब्रुवारीच्या पहिल्याचच आठवड्यात लागली होती. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ विदर्भाच्या या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होती, असे सगळे असताना फेब्रुवारीतच योग्य ती पावले उचलण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही ?

या परिस्थितीत शाश्वती कशाचीही नाहीये, हे आपण सगळ्यांनाच माहिती होतं. असे असताना आपण आधीच तयारी का नाही केली ? रुग्णालयांची संख्या, व्हेंटीलेटर्सची संख्या, ऑक्सिजन बेड्सची संख्या हे सर्व वाढवण्यासाठी आपण तयारी का केली नाही ? हा सामान्य माणसाच्या मनात उठलेला प्रश्न आहे.

महाराष्ट्रात पुढे काय होतं हे आई भवानीला ठाऊक मात्र ही वेळ आहे भरपूर काळजी घेण्याची. कुणाहीवर अवलंबून न राहता, राज्य सरकारकडून अपेक्षा न ठेवता स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एकमेकांची मदत करण्याची आवश्यकता आहे. आपण एवढं नक्कीच करू शकतो.