अदर पूनावाला यांना सुरक्षा का मागावी लागली ?


भारतातील सगळ्यात मोठ्या व्हॅक्सीन कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना धमक्या मिळत असल्याने ते आपल्या परिवारासह लंदन येथे निघून गेले, असल्याची माहिती समोर आली, त्या संदर्भात अदर पूनावाला यांनी सुरक्षेची मागणी देखील केली आहे, मात्र त्यांना सुरक्षेची मागणी का करावी लागली ? असा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, आणि हा प्रश्न आज भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित केला.

अदर पूनावाला यांना कोणी धमक्या दिल्या ? महाराष्ट्रात त्यांचे कारखाने असताना, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता आणि कुणाच्या दबावाखाली येऊन ते काही दिवसांसाठी भारत सोडून गेले, हा प्रश्न खरं तर प्रत्येकाच्याच मनात उपस्थित झाला आहे. असे असताना त्यांना सुरक्षा का मागावी लागली, त्यांच्यावर असे काय प्रसंग ओढवले ? असा प्रश्न आज शेलार यांनी उपस्थित केला. अदर पूनावाला यांनी सांगितले होते, कि व्हॅक्सीन मागणी वरून त्यांना धमक्यांनी भरलेले अनेक फोन आले. आणि याच फोन्सना कंटाळून ते लंदन येथे परिवारासह निघून गेले आहेत आणि काही दिवसांनी भारतात परत येतील.



पंढरपूर येथील पोटनिवडणूकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश आणि पश्चिम बंगाल येथे भाजपच्या झालेल्या पराभवाबद्दल देखील त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी सांगितले कि, “भाजपचा पश्चिम बंगाल येथे पराभव झाला जरी असला तरी देखील संपूर्ण निवडणूकीत भाजपचाच डंका वाजतोय. भाजप ने ३ सीट ते ८३ सीट्स अशी मुसंडी मारली आहे, असम मध्ये देखील भाजपने आपले भक्कम पाय रोवले आहेत. काँग्रेसचे वाष्पीभवन झाले. ममता बॅनर्जी पराभूत झाल्या, त्यांची हवी तशी वाढ झाली नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बेळगाव आणि पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर केलेलं वक्तव्य पाहता, या मुद्द्यांवर बोलण्याची संजय राऊत आणि शिवसेनेची लायकी नाही अशा शब्दांत शेलार यांनी त्यांचा समाचार घेतला. ज्यांचं सरकार कुबड्यांच्या आधारावर आहे, जे त्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू शकत नाहीत अशा पक्षानं इतर पक्षांच्या यशाबद्दल बोलण्यात अर्थ नसल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर घणाघात केला.