अनिल देशमुखांची ईडी कडून चौकशी…!

महाराष्ट्रात अनिल वाझे प्रकरण बाहेर आल्यापासून आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यापासून देशमुखांचे नाव अधिकच चर्चेत आहे. मात्र आज त्यांचे नाव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे आज ईडी कडून अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्या नागपुर आणि मुंबई येथील “सुखदा” या निवासस्थानावर ईडी कडून छापे मारण्यात आले आहेत. 

देशमुखांशी संबंधित ५ ठिकाणी या धाडी पडल्या आहेत. नागपुरातील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी व सुखदा याठिकाणी ईडीने छापेमारी केली. सकाळी ८ वाजल्यापासूनच ही कारवाई सुरु झाली आहे. सुरूवातील अनिल देशमुख दिल्लीला असल्याची माहिती मिळत होती. मात्र या कारवाई दरम्यानच देशमुख वरळीतील सुखदा या निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे ईडी अनिल देशमुखांची चौकशी करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे. ईडीच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या नागरपूर येथील निवासस्थानी जमायला सुरुवात केली. आक्रमक कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिले होते. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत असतानाच मे महिन्यात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक व्यवहाराच्या अँगलने ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

महाराष्ट्राचे राजकारण सचिन वाझे प्रकरणापासून एका नव्या वळणावर आले आहे. हे सरकार टिकू शकेल का ? का अशा घटनांमुळे या सरकारची मुळे हालतील? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढे काय होतं हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.