महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ…! तिसऱ्या लाटेची पहिली घंटा?



कोरोनाचा प्रादुर्भाव जेव्हा पासून भारतात झाला आहे, महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे जिथे सुरुवातीपासून सर्वाधिक कोव्हिड पेशंट्स आढळले, असे असताना नुकतीच बातमी आली, कि महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल एका दिवसात महाराष्ट्रात १० हजार नवीन केसेस आढळल्या आहेत. जेव्हा मध्यप्रदेश येथे हा आकडा केवळ २ डिजिट असून दिल्ली येथे देखील ३५०-४०० हून अधिक रुग्ण नाहीत, असे असताना महाराष्ट्रात ही संख्या एका दिवसात १० हजार पार करते, ही एक चिंतेची बाब आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही संख्या तिसऱ्या लाटेची पहिली घंटा तर नाही ना ? असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे.

त्यातून कोरोनाचा नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लस आलेला आहे, या व्हेरिएंटचे एकूण २५ पैकी १६ रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. असे असताना यापुढचे भविष्य कसे असणार किंवा त्यासाठी कुठल्या पद्धतीची तयारी हवी, हे गेल्या १.५ वर्षांच्या अनुभवातून आपण शिकायला हवं. कारण या वेळेला आपण जरका तयार नसू तर नुकसान कितीक पटीने मोठे असेल. असे असताना महाराष्ट्र सरकार येणाऱ्या काळासाठी तयार आहे का ? महाराष्ट्राची जनता तयार आहे का ?

या लेखाचा उद्येश्य जनतेत भितीचे वातावरण पसरविणे नाही, तर जनतेला इशारा देणे आहे कि धोका अजून टळलेला नाही. आपली रोजचे आयुष्य पूर्वपदावर आणत असताना, काळजी घ्यायला विसरू नका. अनलॉक झाले असले तरी कोरोना असून गेलेला नाही. अधिकाधिक प्रमाणावर लसीकरण सुरु आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात धोका कमी असावा असा अंदाज बांधला जात आहे, मात्र केवळ या एका अंदाजावर अवलंबून राहता येणार नाही. हातात वेळ असताना महाराष्ट्रात आरोग्य व्यवस्थेत गरजेच्या असलेल्या सुधारणा होणं अपेक्षित / आवश्यक आहे. सोबतच नागरिकांना देखील या गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे कि जिम, रेस्टॉरेंट्स सुरु जरी झाले असले तरी दर वीकएंडला जाऊन बाहेर खाणे, फिरणे, हिंडणे हे आवश्यकच आहे का ? आपण गर्दी वाढवून तिसऱ्या लाटेला अक्षतांसह आमंत्रण तर देत नाही ना ? हा विचार सामान्य माणसाने करायला हवाय.



पुढच्या काळात काही झाले नाहीच तर अतिशय उत्तम आहे. मात्र याची काय गॅरेंटी कि काही होणारच नाही ? अचानक संख्या वाढली, पुन्हा एकदा बेड मिळणे, ऑक्सिजन मिळणे अशक्य झाले, हा नवीन आलेला व्हेरिएंट अधिक धोकादायक असला तर आपण काय करणार आहोत ? यासाठी प्रशासन म्हणून सरकार आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी तयार राहणे आवश्यक आहे. पावसाने घर खराब होईलच असं नाही, मात्र पावसाआधी आपण घराची डागडूजी, बागकाम करतोच ना, हे तसंच आहे. वेळीच सावध व्हा, वेळीच तयार रहा, म्हणजे तिसरी लाट आलीच तर तिचाशी दोन हाथ करायला आपण समर्थ असू.

सरकारने व्यवस्थेवर आणि नागरिकांनी स्वत:च्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे. तेव्हाच कोरोनाशी असलेली लढाई आपण जिंकू शकू.