
आज मान्सून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत गदारोळ झाला. ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षाने सरकारवर कडाडून निशाणा साधला. मात्र आज विरोधी पक्षाच्या १२ आमदारांना आज निलंबित करण्यात आले. आणि त्यावरुन विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “आम्ही ओबीसी आरक्षण या मुद्यावरुन सरकारला उघडे पाडले, म्हणून आमच्या १२ आमदारांवर खोटे आरोप लावून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आमचे १२ काय १०६ आमदार देखील निलंबित करा, मात्र ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी आमचा संघर्ष सरुच राहील.”
“माझ्यावर हक्कभंगाचा आरोप केला तरी देखील चालेल मात्र मी स्पष्टच सांगतो कि, सत्ताधारी पक्षाकडून स्टोरी तयार करण्यात आली. भाजपच्या सदस्याने त्याठिकाणी शिवी दिली नाही. शिवी देणारे कोण होते हे सगळ्यांनी बघितले आहे. असा परिस्थितीत शिवसेनेच्या सदस्यांनी धक्काबुक्की केली, आणि जे ही हीटेड एक्सचेंजेस झाले, त्यासंदर्भात आशीष शेलार यांनी सर्वांच्या वतीने भास्कर जाधव यांच्याशी माफी मागितली, आणि तो विषय संपवून आम्ही इथे बाहेर आलो. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी आमच्या आमदारांच्या विरोधात ही स्टोरी केली आहे. त्यानंतर ही जी कारवाही झाली, ही ‘मॅनिफॅक्चर्ड कारवाही’ आहे.” असेही ते यावेळी म्हणाले.
“सत्ताधारी पक्षाला अशी भिती आहे कि सदनात आम्ही त्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढू, त्याभितीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.” असेही फडणवीस यांनी सांगितले. आज विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन गदारोळ झाला, बाचाबाची आणि शिवीगाळ देखील झाली. मात्र विरोधीपक्षाने स्पष्ट केले आहे कि ही शिवीगाळ त्यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे आता एकूणच ओबीसी आरक्षण आणि आजच्या मान्सून सत्राच्या पहिल्या दिवसावरुन वादावादी सुरु आहे.
आमचे सगळे आमदार निलंबित करा, मात्र तरी देखील आमचा ओबीसी आरक्षण मिळवण्याचा संघर्ष सुरु राहील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे आता या घटनेत पुढे काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
