महाराष्ट्रातील सरकार स्थिर की अस्थिर?



महाराष्ट्रात जेव्हापासून आघाडी सरकार सत्तेवर आहे, तेव्हापासून राजकारणात दर दिवशी काही घडामोडी होणार नाही, असे कसे शक्य आहे? तर कांग्रेस नेते नाना पटोले यांनी असे जाहीररित्या सांगितले कि त्यांचे फोन टॅप करण्यात येत आहेत, आणि यासाठी त्यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरले आहे. मात्र त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेस डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त झाली आहे. एकूणच शंकेची पाल कुठेतरी चुकचुकते आहे.


महाराष्ट्रात काँग्रेसला केवळ संख्याबळासाठी वापरण्यात आले आहे, आणि काँग्रेसने देखील जीवंत राहण्याच्या दृष्टीने या आघाडी सरकारमध्ये सहभाग घेतला आहे, असे मत अनेक राजकीय विश्लेषकांचे आहे. आणि ज्यावर आता हळू हळू सामान्य माणसालाही विश्वास बसायला लागला आहे. मात्र ते तीन पायांचे सरकार वेगवेगळ्या दिशांनी धावणारे आहे, त्यामुळे कधीतरी तर धडपड होणारच नाही का ? तसाच पाहीसा प्रकार आज झाला. आज नाना पटोले यांनी विधान दिले कि त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे, आणि यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेठीस धरले. मात्र त्यांच्या या विधानाने महाराष्ट्र काँग्रेस मात्र कचाट्यात सापडली, आणि आता डॅमेज कंट्रोल म्हणून “नाना पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’ असे काहीसे काँग्रेस कडून सांगण्यात येत आहे.

नाना पटोले यांनी देखील पलटी मारली आहे, आणि त्यांनी “मी जे काही बोललो ते केंद्राबद्दल बोललो, मी आयबीच्या रिपोर्ट बद्दल बोललो, ही सर्व विधाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असल्याने, भाजप बैचैन झाले, आणि म्हणून माझ्या वक्तव्याचा असा काहीसा बनाव करण्यात आला” अशा अर्थाचे विधान पटोले यांनी वादंग उठल्या नंतर दिले.

एकूणच महाराष्ट्रात सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसल्याने नेमके काय सुरु आहे, याची माहिती कुणालाच नाही, त्यातुन अधून मधून असे फुसके बार सुटण्यामागे, पुढे येणाऱ्या मोठ्या धमाक्याचा संदेश तर नाही ना ? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात उठल्या शिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुढे काय होणार हे बघणे औत्सुक्याचे आणि महत्वाचे ठरणार आहे.