पूर परिस्थितीत राज्य सरकार ने निकषांबाहेर जाऊन ठोस मदत केली पाहिजे – देवेंद्र फडणवीस



आज सांगली तालुक्यातील विविध गावांच्या परिस्थितीची पाहणी केली. दुर्दैवाने 2 वर्षांतच पुन्हा एकदा सांगलीवर तेच संकट आले. मागच्या वेळी आमचे सरकार असताना नागरिकांना त्वरित मदत करण्यात आली होती. घरे देण्यात आली, तसेच तात्पुरते पुनर्वसन करताना त्यांच्या घराचे भाडेही देण्यात आले होते. असेच सगळे आता देखील या सरकारने केले पाहिजे. एनडीआरएफकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार कडून मदत तर येतच आहे, मात्र सरकारने अशा परिस्थितीत निकषांबाहेर जाऊन ठोस मदत केली पाहिजे. असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. गावाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

गेल्या वेळेला पंचनामा झाला नाही तर मोबईलच्या फोटोला पुरावा मानून नागरिकांना मदत देण्याचा आदेश आम्ही दिला होता, तसेच यावेळी देखील झाले पाहिजे. अशी मागणी आम्ही करत आहोत. असे देखील ते यावेळी म्हणाले. बारा बलुतेदारांच्या सुद्धा अनेक समस्या आहेत. राज्य सरकारकडून मदत मिळण्यासाठी आपण संपूर्ण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.



एकूणच महाराष्ट्रात आलेल्या या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांनी आयुष्य भर मेहनत करून उभा केलेला संसार एका क्षणात पाण्यात गेलाय, त्यामुळे नागरिकांना या क्षणी सरकारच्या मदतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. आणि असे असताना सरकारकडून अद्याप काही ठोस मदत जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्देशांमध्ये ठोस मदतीचा आकडा कुठेही नाही अशाने सामान्य नागरिकाने बघायचे तरी कुणाकडे असा प्रश्न इथे निर्माण झाला आहे.

विरोधी पक्षाच्या या मागण्यांना आणि त्यांच्या आधीच्या अनुभवलाला लक्षात घेऊन राज्य सरकार या मागण्या मान्य करते का, आणि पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.