
महाराष्ट्र राज्य गेल्या काही दिवसांपासून, तसे म्हटले तर गेल्या एका वर्षापासून अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्यामध्ये कोरोनाचे सगळ्यात अधिक रुग्ण आणि मृत्यु तर आहेतच मात्र त्याशिवाय अतिवृष्टी आणि नुकताच आलेला पूर देखील आहे. या अतिवृष्टि आणि पूराने महाराष्ट्राच्या काही भागांना अक्षरश उद्ध्वस्त केले आहे. असे असताना जनतेला सरकार कडून असलेल्या अपेक्षा सरकारला पूर्ण करता आलेल्या नाही. आणि पूर आल्यानंतर इतक्या दिवसांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत गरजूंना मदत जाहीर केली आहे. याला त्यांनी तातडीची मदत असे देखील म्हटले आहे, मात्र इथे प्रश्न निर्माण होतो, ही खरंच तातडीची मदत आहे का?
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज ट्वीट करत म्हटले आहे कि, “नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.”
हा मदत निधी नक्कीच आवश्यक होता, मात्र हा निर्णय कितीतरी आधी घेणे अपेक्षित होते. 2019 मध्ये जेव्हा कोल्हापुर आणि सांगली भागात असाच पूर आला होता, तेव्हा त्यावेळच्या राज्य सरकार ने त्वरित निर्णय घेत, मदत जाहीर केली होती. मात्र यावेळेला पूर येण्याचा सुमारे एक आठवड्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मदत निधी जाहीर करण्यात सरकारला उशीर तर नाही ना झाला, असा प्रश्न इथे निर्माण होतो.
या पूराची विदारक दृश्य आपण सगळ्यांनी समाज माध्यमांवर बघितली. त्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एकत्र पूरग्रस्त भागाची पाहणी केली, शक्य ती मदत केली, त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय तर पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची सवड मुख्यमंत्र्यांना नंतर मिळाली. इथे राजकारण करणे हा मुद्दा नाही, मात्र 2019 चा अनुभव हाताशी असल्या कारणाने विरोधी पक्षाने त्वरित पावले उचलून त्यांना शक्य ते सर्व केलं, मात्र सरकारने करायची कामे ती सरकारच करू शकते, असे असताना सरकारला इतक्या उशीरा जाग का आली.
आज पूर ओसरला आहे, हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असताना ज्यावेळी जनतेला सरकारची, सरकारी मदतीची गरज होती, त्यावेळी सरकारने जनतेकडे डुंकूनही बघितले नाही, मात्र आता जेव्हा परिस्थिती थोड्या फार प्रमाणात बरी होताना दिसते आहे, सरकारला तेव्हा जाग येते आहे. हे दुखद नाहीच तर विकृत देखील आहे.
जनतेच्या पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे, आणि त्यातून हे सरकार या जनतेला कसे बाहेर काढेल हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
