
आज ओलंपिक खेळांमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला. भारताने आज ओलंपिक खेळांमध्ये कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात जर्मनीला 5-4 या अंकाने मात देत कांस्य पदक भारताच्या नावे केलं. आणि 41 वर्षांनंतर हॉकीसाठी भारताने पदक जिंकत ओलंपिक मध्ये एक नवीन इतिहास रचला. आज संपूर्ण भारत देशाला या पुरुष हॉकी संघावर अभिमान आहे. मात्र या भावना भारताच्या पंतप्रधानांनी खुद्द बोलून दाखवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे कॅप्टन मनप्रीत सिंह यांना फोन केला आणि शुभेच्छा दिल्या. त्यांनी संघातील खेळाडू आणि कोच यांच्याशी देखील संवाद साधला. अतिशय भावुक असे ते क्षण होते.
आपण आज पर्यंत अनेक देश प्रमुखांना ट्विटर आणि समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा देताना बघितले आहे. मात्र स्वत फोन करून त्यांना शुभेच्छा देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले, ही एक खूप महत्वाची घटना आहे.
जेव्हा आपण एखादे पुरस्कार जिंकून आपल्या घरी येतो, आणि आपल्या घरातील वडील मंडळी आपली पाठ थोपटवून आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद देते, आपले कौतुक करते, तर ती भावना आपल्यासाठी त्या पुरस्काराहून देखील खूप मोठी असते. अशीच भावना आज आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या मनात असणार आहे.
आज भारताने 1980 नंतर तब्बल 41 वर्षांनी ओलंपिक मध्ये पदक मिळवले आहे. आज संपूर्ण भारताला आपल्या पुरुष हॉकी संघावर अभिमान आहे.
