
गेल्या २ दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेटवर केवळ आर्यन खान आणि ड्रग्स प्रकरणाच्या बातम्याच बघयाला मिळताएत. एकूणच सिनेसृष्टीतील कलाकार आणि ड्रग्स यांचा जवळचा संबंध आहे, हे आपल्याला अगदी संजय दत्त, आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यु प्रकरणावरुन समजलंच असेल, मात्र प्रश्न केवळ एवढा आहे कि या सगळ्याचं पुढे काय होतं? किती सिने कलाकारांना याविषयी मोठी शिक्षा सुनावली जाते, केवळ सुनावणीच्या नावाखाली अनेकदा चौकशी केली जाते, कोर्टात केस रंगते आणि मग सर्व थंड पडतं, याचं अगदीच ताजं उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु प्रकरणी ड्रग्स प्रकरणात अडकलेले सिने कलाकार आज मोकाट फिरताएत, त्यांच्या नव्या फिल्म्स येताएत, वेबसीरीज येताएत आणि जनता देखील विसरत चालली आहे, मात्र आर्यन खानच्या प्रकरणाने त्या सर्व आठवणींना उजाळा दिला आहे, आणि पुन्हा तोच एक प्रश्न उत्पन्न झाला आहे कि आता पुढे काय ?
आर्यन खान म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा, दोन दिवसांपूर्वी मुंबई ते गोवा जाणाऱ्या एका क्रूर वर रेव पार्टी दरम्यान पकडला गेला. इतर ८ लोकांची नावे देखील या प्रकरणात पुढे आली आहेत, त्यापैकी ३ लोकांना तिथेच अटक करण्यात आली ज्यापैकी एक होता आर्यन खान. शाहरुख यांचा चिरंजीव, आणि दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर “अमीर बाप की बिगडी औलाद” एकूणच एखादा मुलगा रेव पार्टीत पकडल्या जातो, तो तिथे असतो, म्हणजे काही तो धुतल्या तांदुळा इतका स्वच्छ नक्कीच नाही. आर्यनच्या वकीलांचं म्हणणं आहे कि त्याच्या कडून कुठल्याही प्रकारचे ड्रग्स पकडल्या गेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाशी त्याचा संबंध नाहीये, आणि पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणून त्याचा खोटा कबुलीजबाब नोंदवला आहे.
एकवेळ विचारही केला कि त्याने ड्रग्स आणले नसतील किंवा त्याच्याकडे ड्रग्स नसतील मात्र यामुळे तो ड्रग्स घेत नाही, किंवा त्याचा आणि ड्रग्सचा काहीच संबंध नाही, असे होत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची मुळापर्यंत चौकशी ही झालीच पाहिजे. सोबतच अशा सर्व बड्या बापांच्या पोरांनी धसका घ्यावा असा काहीसा निर्णय या प्रकरणी लागला पाहिजे.
आजही आपण डीडीएलजे, डर, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है, किती प्रेमाने बघतो. त्याचं एकमेव कारण म्हणजे शाहरुख, आजही किंगखान ला डोक्यावर घेणारं पब्लिक आहे. मात्र आपण ज्यांना हीरो म्हणून हॅशटॅग प्रसिद्ध करतो, ते खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांचे संस्कार कसे आहेत, ते आपल्या मुलांना काय संस्कार देताएत, हे सर्व बघून मगच त्यांच्या उदात्तीकरणाचा निर्णय घ्यावा. हे सर्व अभिनेते खरंच हीरो म्हणवण्याच्या लायक आहेत का ? ते खरंच तसे आदर्श समाजापुढे ठेवतात का ? हा प्रश्न खूप मोठा आहे.
शाहरुख खानच्या समर्थनार्थ पुढे आलेले अभिनेते आणि फॅन्स आर्यन ला २३ वर्षाचा “लहान” मुलगा असे संबोधताएत, आर्यन अजून लहान आहे, त्याच्या सोबत इतकी कठोर वागणूक नको, असे देखील काही सूर समोर आले आहेत. मात्र याच २३व्या वर्षी झाशीची राणी इंग्रजांशी लढता लढता शहीद झाली होती, याच २३व्या वर्षी भगतसिंह शहीद – ए – आझम झाला होता, अरे इतक्या मागे तरी कशाला जायचं ? याच २३व्या वर्षी नीरज चोप्रा ने देशासाठी सुवर्ण पदक मिळवले, आणि अनेक २३ वर्षीय वीर जवान आज सीमेवर भारताचे रक्षण करताएत, त्यामुळे २३ वर्षाचा मुलगा इतका तरी लहान नसतोच कि त्याने ड्रग्स घ्यावे का घेऊ नये ? रेव्ह पार्टी मध्ये सहभागी व्हावे का होऊ नये याची जाण त्याला नसावी. १८ वर्षी माणसाला मतदानाचा अधिकार मिळतो, आणि मुलांना २१ व्या वर्षी लग्नाचा अधिकार मग २३ वर्षे वय हे लहान कसे म्हणता येईल ?
एकूणच ही हाय प्रोफाइल केस असल्यामुळे याचा निकाल काय लागतो, मीडिया मॅनेज होईल का ? निकाल मॅनेज होईल का माहीत नाही, मात्र या एका केस मुळे सिनेसृष्टीचे किळसवाणे आणि ओंगळवाणे रूप पुन्हा एकदा जगासमोर आले हे मात्र नक्की.
