दिवसा ढवळ्या स्वप्न बघायला महाराष्ट्रात कोणालाही बंदी नाही : अतुल भातखळकरांचा राष्ट्रवादीला टोला



नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी “महा आघाडी सरकार पाच वर्ष सत्तेवर राहील आणि त्यानंतरही निवडून येईल” असे वक्तव्य केले, आणि एकूणच चर्चेचे वादळ उठले. यावर भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला हाणत म्हणले आहे कि, “महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही.”

शरद पवार यांनी असे वक्तव्य केल्यावर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. एकूणच महा आघाडी सरकारचे काम बघता, जनतेचा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात रोष आहे. महाराष्ट्रात एकूणच कोरोनाची परिस्थिती बघता, गृहमंत्र्यांसारख्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले बघता, महत्वाचे अधिकारी फरार झालेले बघता, जनता मोठ्या प्रमाणात नाराज आहे, असे असताना शरद पवार यांनी असे वक्तव्य करणे म्हणजे त्यांनी जनतेला गृहीत धरण्यासारखे आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1449984983192403969/photo/1



पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. “ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपाचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ न लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र माझ्या एका शब्दावर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केलं”, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

मात्र त्यांच्या या वक्तव्याने जनता नाराज आहे, आणि सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आणि एकूणच अतुल भातखळकरांच्या या पोस्टमुळे या आगीत तेल पडले आहे हे मात्र नक्की.