महाराष्ट्रातील सध्याचे सरकार मोठ्या विचित्र परिस्थितीत निवडून आलेले सरकार आहे. हे सरकार ज्यावेळी निवडून आले तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती, आणि अगदी अनपेक्षित असे राजकारण या महाराष्ट्रात घडले. मात्र आता एकदा सरकार निवडून आले, त्यानंतर तरी जनतेने त्यांना सामावून घ्यावे, किंवा जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसावा यासाठी महाराष्ट्र सरकार नी काय प्रयत्न केले, असा प्रश्न उपस्थित झाला.

त्याचे कारण असे कि एकूण सामान्य माणसासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी म्हणजे, रोजगार, उद्योग, आणि आरोग्य याविषयांवर सरकार काम करत असताना कमीच दिसते, उलट सध्याचे महाराष्ट्र सरकार चर्चेत आले तर ते म्हणजे महाराष्ट्राच्या बदहाल कोविड परिस्थिती साठी, कोरोनाच्या परिस्थितीला अतिशय निष्काळजीपणे हाताळण्यासाठी, सुशांत सिंह राजपूत हत्येप्रकरणी पोलिसांच्या हलगर्जीपणासाठी, एंटालिया केस, मनसुख हिरेन प्रकरण, गृहमंत्री अनिल देशमुखांवर लागलेला 100 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप, परमवीर सिंहाचे फरार होणे, आणि आता आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणानंतर, मोठ्या नेत्यांच्या जावयांकडे सापडलेल्या ड्रग्स प्रकरणापर्यंत या सर्व गोष्टींसाठी.
एकूणच गेल्या 3 वर्षात महाराष्ट्र सरकार एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा एखाद्या चांगल्या निर्णयासाठी प्रसिद्ध झाल्याचे दिसून येतच नाही, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उद्योग धंध्यांच्या वाढीसाठी या सरकारने काय केले, असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो ? विचार करून बघा, गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, एंत्रप्रेनियोर्स, मोठे उद्योजक यांची भेट घेतली आहे का ? यांची एखादी समिट भरवली आहे का ? मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स यांच्या माध्यमातून रोजगार कसा उभा करता येईल, याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असे काही त्यांनी केले आहे का ? गूगल रीसर्च करून बघा, तुम्हाला उत्तर मिळणार नाही.
या उटल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राचा औद्योगिक हब म्हणून विकास व्हावा, महाराष्ट्राच्या तरुणांना नोकरीच्या शोधात बाहेर पडावे लागू नये यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले, महत्वाकांक्षी मोठ मोठे प्रोजेक्ट्स असू देत किंवा जनतेच्या सुविधेसाठी असणारा मेट्रो प्रोजेक्ट असू देत. सुविधेसोबतच त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रोजगार जनरेट झाला असता, मात्र मुंबई मेट्रोचे काय झाले आपण बघितलेच.
एकूणच महाराष्ट्रात रोजगारांचा विकास व्हावा, उद्योग धंधे फुलावेत यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न दिसत नाहीत, तर उलट त्यांचे सरकार कुकर्मांसाठीच प्रसिद्ध होत असल्याचे समोर येत आहे. याचा लॉंगटर्म इफेक्ट महाराष्ट्रावर आणि एकूणच या सरकारवर काय होईल, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्या प्रमाणे जरका या सरकारला 5 वर्षे टिकायचे असेल आणि पुढे देखील निवडून यायचे असेल तर भ्रष्टाचार, ड्रग्स अशा विषयांपासून लांब राहून उद्योग आणि रोजगार अशा विषयांवर सरकारने लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा या सरकारचा शेवट कसा होणार याची कल्पना तर आपण करूच शकतो.
