राज्यात आता पहिली ते चौथी ची शाळा लवकरच सुरु करण्यात येणार : आरोग्यमंत्र्यांची घोषणा



राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळू हळू कमी होत आहे, असे असताना मॉल्स आणि इतर ठिकाणी नागरिकांची वर्दळ सुरु आहे, ज्यामध्ये लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्यात आता पहिली ते चौथी या वर्गांची शाळा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

टोपे यांनी ही माहिती देताना सांगितले कि, “राज्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, असे असताना लवकरच पहिली ते चौथी वर्गाची शाळा सुरु करण्यात येईल. यासाठी पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत, त्यांचे लसीकरण सुद्धा करण्यात आले पाहिजे.” या संदर्भात टोपे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्यासाठी परवानगी मागितली आहे. उद्या कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम निर्णय ठरेल असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.



राजेश टोपे म्हणाले की, नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50% परवानगी दिली आहे.  ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही.  बिनधास्तपणा जाणवतोय.  ही मानसिकता घातक आहे.  जागरूक राहिले पाहिजे.  दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे म्हणाले. 

टोपे म्हणाले की, राज्यात आता 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही.  पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही, असं टोपे म्हणाले. 

बूस्टर डोससंदर्भात बोलताना ते म्हणाले की,  आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे.  तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे.