
आज राज्यात मंत्री मंडळाची बैठक पार पडणार आहे. एकूणच राज्याची सद्य परिस्थिती पाहता, आणि कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटची राज्यात झालेली एंट्री पाहता, आजची ही बैठक महत्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धर ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का ?
आजच्या या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट यायच्या आधी ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी वर्ग सुरु करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तूर्तास तो निर्ण रद्द करण्यात आला. त्यामुळे आता पुढे काय होतं ? शाळा सुरु होतात का ? याची माहिती आजच्या बैठकीनंतर कदाचित समजू शकेल. आजच्या या बैठकीवर मुलांचे भविष्य अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती, मात्र आता या निर्णयाचे पुढे काय होते, हे देखील आजच्या बैठकीनुसार ठरेल.
एसटी आंदोलनाला एक महिना पूर्ण :
एसटी आंदोलनाला एक महिना आज पूर्ण होतोय. राज्यातील काही भागातील एसटी सुरक्षा पुरवून सुरु होत असली तरी अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचारी शासनात विलिनीकरणाची मागणी घेऊन चांगलेच आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात देखील आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो.
एकूणच आजच्या या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय येण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बैठकीवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
