
देशासह राज्यात लहानमुलांच्या लसीकरणाला आता सुरुवात झालेली आहे. वयवर्षे १५ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना ही लस देण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना या भयंकर रोगापासून वाचवण्यासाठी त्वरित हे लसीकरण सुरु झालेले आहे. आज या लसीकरणाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी पहिल्या दिवशी देशभरात सुमारे ४० लाख मुलांनी ही लस घेतली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केलं आहे की, “रात्री 8 वाजता जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 40 लाखांहून अधिक मुलांनी पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरणाच्या आकड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आनंद व्यक्त केला आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवला.”
यावेळी लसीकरण केंद्रांवर गर्दी दिसून आली. अनेल मुलांच्या परिवारानी आता सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. एकूणच देशाची सद्य परिस्थिती बघता, लहान मुलांचे लसीकरण अत्यावश्यक झाले आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, “कोविड-19 पासून मुलांचं संरक्षण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीचा डोस घेणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांना शुभेच्छा. त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा. येत्या काही दिवसांत मी सर्व तरुणांना लसीकरण करून घेण्याची विनंती करतो.”
एकूणच लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे सर्व पालकांनी सद्य परिस्थिती लक्षात घेता लवकरात लवकर त्यांच्या मुलांना लस देणे आवश्यक झाले आहे. आता १५ वर्षांहून खालील मुलांसाठी लस कधी येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
