
महाराष्ट्रात अनेक मुलांना मायेच्या पंखांखाली घेणाऱ्या, अनाथ बालकांना घर देणाऱ्या आणि हजारो मुलांची ‘माय’ म्हणून जगावर आपली एक अमिट छाप सोडणाऱ्या सिंधुताई सपकाळ अनंतात विलीन झाल्या. काल पुण्यात 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांचे हर्निया चे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होता. काल अखेर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले, आणि अनाथांची माय हरपली. सिंधुताईंच्या जाण्याने समाजात एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून निघणे शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींने देखील शोक व्यक्त करत सिंधुताईंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलं चांगल्या दर्जाचे आयुष्य जगू शकली. त्यांनी उपेक्षित लोकांसाठी खूप मोठं काम केलं आहे. त्यांच्या निधनाने अपार दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.”
सिधुताई सपकाळ यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपले : फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले कि, “वात्सल्यसिंधु समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला आहे. अनेक अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आपण एक मातृतुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे.त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे. हे सदैव लक्षात राहील.” अशा शब्दात सिंधुताईंविषयी आपल्या भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन त्यांचे काम पुढे सुरु ठेवणे म्हणजेच त्यांना दिलेली सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.
अनाथांसाठी क्या केवळ एक मायच नव्हत्या तर अनेक महिलांसाठी त्या एक प्रेरणा होत्या. आपलं आयुष्य संपवण्याच्या मार्गावर असल्यापासून ते वात्सल्यसिंधू सिंधुताई सपकाळ यांचा प्रवास थक्क करणारा होता. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काम करणारी एक माता आपल्यातून निधून गेली आहे. आणि ही क्षति कधीच भरून निघू शकत नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
पद्म्श्री सिंधुताईंचा जन्म मूळ विदर्भात वर्धे येथे झाला होता. त्यांनी अतिशय खडतर जीवन अनुभवले आहे. आणि याच अनुभवातून ज्या प्रेमाला, मायेला त्या मुकल्या, ती प्रेम आणि माया समाजाला मिळावी यासाठी त्यांनी आपले आयुष्य झोकून दिले. ममता बाल सदनाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मायेचे घर दिले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे, आणि ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
